Saturday, August 15, 2009

संन्याशाचा पोर....

दोन महान तत्वांचा संवाद, त्यांच्यातल्या ईश्वरतत्वाला प्रणिपात करुन......

संन्याशाचा पोर.....

असाच आलो होतो चरफ़डत
स्वत:वर आणि जगावर...
वाटलं, भिरकावून द्याव सारं समोरच्या
इंद्रायणीच्या पात्रात आणि
शांत विलीन व्हावं
भगवंताच्या श्वासामधे.....
धाडकन लावली कवाडं...
बंद केली गवाक्षं.....
आणि मोजत राहीलो
ओवीबध्द अवतरणारी,
ब्रह्मवॄंदाची आवर्तनं.......
बंद केल्या ताटीच्या दारापाशी
आलीच नाही मुक्ता आज....
गायलीच नाही ताटीचे अभंग..!!
विषण्ण हसली ती.....
काय संगू रे, बोलली ती
आई, बाबापण हरले आपले
संसाराच्या वेदीवर.....
नसेल जमत कोड्गं होउन जगणं....
तर जा बापड्या, जा पुढं...
आम्ही येतोच मागुती...
असू देत दार बंद...
विचारतो कोण संन्याशाच्या पोरांना....!!!
मी तसाच बंद दाराच्या आत
आणि मुक्ता बाहेरच,
मला तिलांजली दिल्यासारखी..!!



मी मुक्ताई
मुक्त....
एक टिंब.. पूर्णविराम,
आपेगावच्या कुलकर्ण्याच्या एका पिढीचा.....!!
इंद्रायणीच्या पात्रात सोडलेलं एक बिल्वदल
आणि
नेवाशाला झालेल्या विश्वरूपदर्शनाची
एक निस्सीम भक्त....
मी मुक्ताई..... मुक्त !!
आकाशाची तहान होती दादाला
नेवाशाला प्राशन केलं प्रारब्ध
आणि उरला
अवनीवरती एक चमत्कार.....
दादा पसायदान मागत होता..
तेव्हाच त्याच्या डोळ्यात होती
अनेक शून्य
आणि मोठा पूर्णविराम......
कारण नंतर जगायला
कारणच नव्हते..... आम्हा चौघांना !!!
आकाश प्यायल्यावर अजुन गिळण्यासाठी आहे तरी काय ?
असो.....
अजुन् सुरू आहे पसायदान......
उद्या कोणी पाहिलाय ?
पण एक माहिती आहे मला
मी मुक्ताई....... मुक्ता !!

No comments:

Post a Comment