Friday, August 14, 2009

कवितांची रुपे !

आपल्या मराठी कवितेचे व्याकरण सोपे करण्याचा माझा प्रयत्न :


शब्दातून येते सारे
जसे नाजुक तरंग
मधुरता जेथ..,तिथे
ओवी आणिक अभंग... !!

जिथे घुसावेसे वाटते
कधी कुंडली रमल...
वाक्या वाक्यातुन वारे
तिथे गजल... गझल !!

जिथे सांगावेसे वाटे
वाटे जावे आत आत
शुध्दतेचे रूप घेतो
माझा भुजंगप्रयात !!

कधी वाटते माराव्या
मध्यमवर्गीय आरोळ्या
स्थळाकाळाच्या भानात
मग घुमती चारोळ्या !!

जेव्हा पिसाट वैराण
तांडवाचे रूप घेतो
माझ्या फ़ाटक्या मनात
क्षणी मुक्तछंद येतो !!

जे वाटते अतुट
ठावे ज्याला चालरीत
तिथे आधी उमटते
सोवळेसे भावगीत !

जेव्हा वाटे साद द्यावी
मस्तवाल व्हावे आज
ठेक्यावर झिंगावे रे
लोकगीताचाच बाज !

जेव्हा कधी वाटतसे
बदलावा हा पैटर्न
थिरकावे चिंब होत
मनी र्हिदम वेस्टर्न... !

मनामधे भिजताना
तुझी आठवण येते
डोळ्यातुन भरलेल्या
तिचे बालगीत होते !

जेव्हा मारवा दाटतो
निस्तेजतो तेजमणी
जेव्हा बोलवी उंबरठा
रूप घेते विरहीणी !

हातातुन सुटताना
जेव्हा काहुर माजते
भावगीताचे सहज
मग मॄत्युगीत होते !

जेव्हा वाटे गोड व्हावे
काही नको नवे गुढ
मेलडीच्य संगे ठेका
हाच मालिकांचा मूड !

जेव्हा आघात असावा
स्रोत झोकात साठावे
तेव्हा आर्या निवडता
केकावलीतून जावे !

जेव्हा वाटते शुध्दता
माझे माझ्यासाठी गाणे
मात्रा शुचितेची मग
स्वच्छ श्लोकात राहणे !

साधे सुधे मठ्ठसुध्दा
कधी लिहावे वाटते
जुने नाही, आज नवे
चित्रपटगीत होते.... !

साधे आणि सुमधुर
तत्व तरीही बाजारू
गुलजार, मजरूह
करावे त्यांना गुरू.... !

जेव्हा वाटते घालावी
एक हलकीशी शीळ
भेटकार्डांसाठी मित्रा
तुच नाजुकसा तीळ !

जेव्हा शब्दावर पोट
मस्त रचनाही होते
तुझ्या ओळींची रे दोन
आज जाहिरात होते !


जेव्हा एखादी कविता
काही विचार मांडते
शॄंखलेत तिच्या वेडी
पटकथा रे बनते !

जेव्हा पडते काव्यात
निळ्या सावळ्याची गाठ
कशा रुपक, यमक..
सोपे शब्द.. भेट थेट !

कधी नाजुक होवुनी
वा-या पा-याचाही भास
छोटे छोटे लडिवाळ...
पुन्हा पुन्हा अनुप्रास !

कधी ठेक्यासाठी सारे
कधी दादरा - केरवा
इथे आठव, साठव....
जेव्हा मनात पारवा !

जेव्हा समर्पित होतो
मागे उभा जगदीश...
स्वरातीत सुरमयी...
तेव्हा बनते बंदीश !

जेव्हा भुतकाळाचे रे
मनी वाजते संबळ...
घुम घुम मातीमधे
पिंगा, पोवाडा, गोंधळ !


जेव्हा वाटते फ़ेकावे
चाली रीतींचे जोखड
खुले आसुड ओढावे
मग रचुन भारूड....!!

जेव्हा जेव्हा खट्याळसी
तिची येते आठवण.....
गोकुळाची गाणी गावी
मस्त यावी गवळण !!


कधी ऐकसी यमन
शांत, शुध्द, शुभ्र रास
सोपे सोपे शब्द तुझे
नको टाकाउ आरास....


कधी जर आसावरी
खरी खरी तठस्तता
उत्तर रात्र रंगते
शब्दा दे प्रगल्भता....

स्मरशी तू मालकंस
तेजगर्भ तेजबिज
घुसणारे शब्द व्हावे
शब्द कसा..., जणु वीज !

जेव्हा ऐकसी सुंदर
दिसणारा मधुकंस
मनातले सारे सारे
शब्द व्हावे राजहंस !

जेव्हा जाणसी भैरव
स्फ़टिकता अनाहुत
शब्द, सूर, ताल सारे
आपोआप, शुचिर्भूत !


जेव्हा बोलावे वाटते
जाण आपोआप येते
मन गाभा-यात जाग
त्याची कविता रे होते !

नको काही सावरुन
नको काही आवरण
जेव्हा खरा तू स्वत:शी
मागे येते व्याकरण.....!

शांत कोजागिरी साठी
जेव्हा सजेल कोयरी
गादी बैठक लोडाची
तेव्हा करावी शायरी.....

जेव्हा एकसष्ठीवेळी
बोलशील रे सबंध
तिथे नसावी कविता
स्पष्ट वाचावा निबंध !!

तिच्यासवे बोलताना
वेणीमधे फ़ुले माळ
नको तिथे रे कविता
शब्द सांभाळ सांभाळ !

कधी जाहला सत्कार
नको काही शब्द नाद
जरा हुंदका दाटुन
म्हण मित्रा .. धन्यवाद !!

1 comment:

  1. Rahul..... too Good....
    कधी जाहला सत्कार
    नको काही शब्द नाद
    जरा हुंदका दाटुन
    म्हण मित्रा .. धन्यवाद !!

    khup khup sahich re....

    ReplyDelete