Saturday, August 15, 2009

फ़्रिज....

असं तुमच्या आयुष्यातही घडू शकेल......


फ़्रिज
आठवणींना हातात घेउन
बोलत होतो.....
बरच जुनच...
पुन्हा नव्याने सांगत होतो...
हसत कण्हली आठवण
म्हणली......
आत्ता नको
खुप दुखतय मनात
इतकं नको !!
नंतर बोलूयात....
माझ्या गळ्यात दाटलेला हुंदका
आणि मखमली आवाजाची थरथर
तिला जाणवली.....
काळी पाच मधे पोहोणा-या सुराला
सा पण नाही लावता येत.. ?
आठवणच उसवली......
मी पण बोललो........
इट्स ओके ग....
उद्या बोलू......
ओरखड्यांना पुन्हा झेलू !!
हसली ती पण...
म्हणाली मला.. शांत आणि नीट ठेव मला........
कुठे ठेवशील तो पर्यंत..... ?
मी निर्लज्जासारखं उठलो......
फ़्रिजच दार उघडल....
आणि शिळ्या चपात्यांच्या बाजूलाच
या आठवणींचं बोचकं सरकावून दिलं....
राहील च्यायला... आता किती दिवसही फ़्रेशच !
आणि झालाच कडक दगड.... तर
मायक्रोवेव्ह आहेच की......
तिला तापवायला........ !!
राहू देत..
जाईल कुठं ?



काल जरा कंटाळा आला
वर्तमानाचा आणि अचानक
आठवण आली त्या बोचक्याची....
लगेच फ़्रिजचं दार उघडलं
आणि हातात घेतलं ते थंडगार
बोचकं आठवणींचं !
उघडलं......,
आणि बघतोय तर काय ?
सगळं कडक आणि गारढोण !!
मी हलवून पाहिलं...
च्यायला,
दगड कधी गदगदेल का ?
त्या थंडगार दगडात,
माझी आई होती.... माझा बाप...
आणि माझा भूतकाळ.......
दगड झालेली गार आणि थंड आई !!
शांत झालेला बाप.......
आणि कोप-यात निपचीप पडलेलं
माझं.. शुभंकरोति !!
ए, आई.... मी हाक मारत होतो.....
बाबा...... मी किंचाळत होतो...
माझं आठवणींच बोचकं...
पाण्यातून ठिपकत होतं.....
मी धावतपळत मायक्रोव्हेव ओन केला......
अनिमीष बघत होतो......
वितळत जाणा-या माझ्या बालपणाला....
घेतल हातात....
बघतो तर काय ?
चिवट... वातट...... चिकट......
आणि मधूनच कोरडा झालेला
माझा भूतकाळ....
ठिसूळ आणि चिवट......
करपून गेलेली आई
आणि कोळसा झालेला बाप !!
शास्त्र फ़सलं होतं.................
आठवणींचं बोचकं.....
मला एकट्याला टाकून पुन्हा
फ़्रिज मधे निपचीप निजलं होतं !!!!



काल बराच वेळ दिवे गेले होते....
मी उकाड्यावर वैतागून बसलो होतो....
अचानक,
पन्ह्याचा ग्लास घेउन ती आली.....
काय ग ? मी किंचीत आश्चर्यचकित....
चक्क लाजली
थैक्स् हो.....
अस काहीस कुजबूजली....
माझ्या छातीवर डोकं घुसळत
काहीसं पुटपुटली........
आज मी तुमच्या आवडीची उसळ करतीये ह्म्म्
आणि तशीच... झुळूक म्हणून निघून गेली.....
मी जाग्या जाग्या निद्रीस्त...
नंतर ग्लास ठेवायाला आत गेलो.....
दिवे नसल्याने
सारा फ़्रिज पाणी पाणी झाला होता.....
ते माझं बोचकं तिथच बाजुला......
आणि पाणी झालेल्या आठवणीत
तरंगर होती.......
मी तिला पूर्वी लिहीलेली पत्रे....
पण भीडेखातर कधीच पोस्ट न केलेली !!!


आज
थालिपीठ जास्तच खमंग
झाले होते.....
एकदम झक्कास...
माझ्या सांगलीची आठवण
करुन देणारे.....
मातीचा वास होता.....
आणि चव तर.... एकदम फ़ंडू.....’
काय ग ... ?
कस्लं... झक्कास जमलय ग.....
मी बोललो.....
हसली ती...
कपाळावरची बट
हलक्या हातानी बाजुला करत
हसली ती.........
कशाला तरी फ़्रिजचं दार उघडलं तेव्हा
पाहिलं.....
नरसोबाच्या वाडीतले माझे जुने फोटो.....
आणि कृष्णाकाठचा गोंधळ.......
कोल्हापुरचा संबळ......
अंधुकसे दिसत होते................
फ़्रिजमधल्या ताकालाही
मंजि-यांचे तुरे फ़ुलले होते !!!!!!!!!!!!

No comments:

Post a Comment