Monday, November 16, 2009

मन.. काही अलिकडचे काही पलिकडचे !!

मन शोधायाचे माझे राहून गेले
मन काठावरती, माझे वाहून गेले
मन केविलवाणे, कुरूप.., म्हटले कोणी,
मन दगड झाले, दगड झाली वाणी !!

ओंजळीत माझ्या आले होते काही
आठवणींचे ओले झेले काही........
ही कशी कोठूनी आली येथे गाणी
मनात विरक्त, एकाकी विराणी !!!!

मन शोधायाला अवकाशी वारा झालो
ही अवनी पाहुनी, सागर लंघुनी आलो
तो तेजगोलही भकास होता जेव्हा,
मन कापुरले ते.. पुन्हा पोरका झालो !!!

नाही ऐसे नाही... कन्फ़ेशन !!

जखम जाहली, नाही ऐसे नाही
घननीळ वेदना, नाही ऐसे नाही
डोळ्यातून हसता, खळ्यात ओले काही
घनगंभीर झरलो, नाही ऐसे नाही !

जगताना रुतलो, नाही ऐसे नाही
पैंजणात गुंतलो, नाही ऐसे नाही
मोगरा अनेकदा, माळूनी भोळा आलो
वासनेत समाधी, नाही ऐसे नाही !

शरीर कापड, कोणी बोलले काही
वस्त्रात अडकलो, नाही ऐसे नाही
या अद्वैताच्या वडा पिंपळाखाली
वस्त्राला विणले, नाही ऐसे नाही !

Friday, October 2, 2009

रात्र : एक नवा विचार !

रात्र : या विषयावर, तिच्या महात्म्यावर आपल्या ग्रंथात बरेच काही लिहीलेले आहे.

आपण रात्र म्हणजे केवळ, घाबरवणारा अंधार असा अर्थ घेत अनेक रचना करत राहतो आणी रात्रीला एक वेगळेच खलनायिकेचे रुप देत राहतो. मात्र, मन, प्राण आणि पदार्थ या तीन वेदिक प्रकाशस्रोतांना अभिव्यक्त करणा-या तीन कालरात्री, महारत्री आणि मोहरात्री या संकल्पनांपासून आपणा दूर दूर पळत राहतो.

रात्र : मला कळलेला अर्थ : जगतो निवेशनि ( ऋग्वेद, १ ३५.१ )......

ratree is the priciple of darkness.. or absorption of all lights..... its the transcedent mother concealing in her womb all manifest forms.....


रात्र : एक नवा विचार !

सूत्र आहे अंधाराचे, गोत्र ब्रह्मवेक्त्याचे
सार जीवनाचे आहे, मोह अभिषेक्त्याचे
रात्र आहे, अंधार नाही, डाव मांडतो जुना
गंजलेल्या कवाडांना, आज खोलतो पुन्हा !!

रात्र भोळी, सोवळी ती, कोवळ्या संवेदना
ती मुक्याने सोसते रे, साहते या वेदना,
नाही काळी, खाष्ट नाही, ती सुरांची यामिनी
वेदनांची झोळी तिची, ती मानीनी.. ती मानीनी !!

सोसूनी ती पोसताना, सूर्य सारा शोषते
ब्रह्मतेज, तेजगर्भ, गर्भदान साहते
अव्यक्ताची गर्भबीजे, श्वासात माउलीच्या
त्रिगुणाची राख होते, स्पर्शाने सावलीच्या !!

वस्त्र आहे अंधाराचे, खोल खोल आसावरी
अथांग आहे, गूढगर्भ, प्रकाशनाळ.. अधांतरी
सूर्य पिउनी, शांत सावली... आता श्वासाचे प्रस्थान
रात्रीच्या गर्भात नव्याने... पुन: उत्थान !! पुन:उत्थान !!!!!!!

Saturday, August 15, 2009

स्वप्नांच्या बेड्या..

लग्नानंतर अनेक गोष्टींमुळे अनेक हुशार आणि व्यासंगी मुलींची करियर कापुर होताना मी पाहिली आहेत. अशाच माझ्या अनेक मैत्रिणींसाठी....!!


स्वप्नांच्या बेड्या मिळतात
बाजारात,
नाजुक, मखमली, अष्टकोनी
आकारात !
तू हसतेस, माप ओलांडतेस
उंब-यात,
पंख ठेवुन आली असतेस
मखरात !
लाजत असते, कौमार्याची
चांदरात
तुफ़ान असते, असते श्वासात
अधरात !
ती समर्पित, तो कल्पित
धुंद वात
सातजन्माच्या अजरामर
बंधनात !
गच्च प्रेम वाहते तिच्याही
होकारात
स्वप्नांच्याच बेड्या वेडीच्या
नकारात !

लावणी..फ़डावरची !

डेरेदार भरजरी श्येला
तुझ्यासाठी..... ,
जीव माझा खुळा !!!!!!

वेलबुट्टीची जरतारी ल्याले
चांदन्यात ग, आजवरी न्हाले
राया तुझीच.. तुझीच झाले
अंगी रंभेचा, नाद लई भोळा १

चोळी अंगात रुतते ग बाई
आग पूनवेची, फ़ुलवित जाई
राया, तुम्हाला मुलखाची घाई
तुझ्या घाईनं.. , केला चोळामोळा २

वळण...

वळण संपते...आयुष्य शिल्लक राहते !!

या वळणावर
वळल्यानंतर
कळले काही
उरले नाही....
सरसरणारे
भिरभिरणारे
क्षण कोवळे
सरले काही.... उरले नाही !!

वळणावरती
अंधुकलेले
गुलाल पक्षी
धुरकटलेले.....
ठेक्यावरचे
जगणे होते
मातीमधले
गुरफ़टलेले.....
आठवणींची
आस लागली
श्वासालाही वळले नाही ... !!

वळणावरती
झुलविणारा
रांगडा झॊका
खेळविणारा.....
नदीकिनारी
वाळवणारा
क्षितीजालाही
खुळाविणारा.....
कधी संपला
काल बावरा
आज आताही उरला नाही ... !!

वळणावरती
सावरलेले
झकास मंदीर
आवरलेले.....
वळणानंतर
उरात काही
मनात काही
काहुरलेले......
आज इथे मी
जगात माझ्या
नाळ आताशा उरली नाही ... !!.

भावना..

आसवांना नाव नाही, भाव आहे
पापण्यांचा चिंब ओला गाव आहे

आठवात मोहरते, भान माझे
सावलीची, मावळती, धाव आहे

पैंजणात बावरले श्वास थोडे
मोग-यात गोंदलेले नाव आहे

या खळ्यांत ओल जणू गुंतलेली
मारव्यात गुंफ़लेला घाव आहे....

संध्याकाळ..

संध्याकाळ.. प्रत्येकाच्या मनातली निराळी !!


अल्लड रुप घेणारी.....

कधी बावरी, कधी लाजरी
असते संध्याकाळ....
कधी नाचरी, कधी बोचरी
असते संध्याकाळ....

कधी पूरिया, कधी मारवा
गाते संध्याकाळ....
कधी आठवे, कधी आसवे
न्हाते संध्याकाळ....

कधी अल्लड, कधी झिम्मड
होते संध्याकाळ....
कधी निखार, कधी फ़ुल्लार
बनते संध्याकाळ.....

तुझ्याचसाठी, तुझी होउनी
येते संध्याकाळ......
निमीषामधे, येते वेडी
जाते संध्याकाळ.......


उंबरठ्याची आठवण करुन देणारी..

ग सांज बावरे
तू ये !!

हुरहुरता श्वास
काहुरता भास
झाकोळती सय बनूनी ये !!

थरथरता ठेका
भिरभिरता झोका
रेंगाळता नाद बनूनी ये !!

सावलीची काया
माउलीची माया
उंब-याचा साज बनूनी ये !!

Miss U...!!!

आकाशाशी बोलताना
सागराकडे बघत.....
वा-याच्या कानात
सांगतेस तू..........
सावळ्याशी बोलताना
सावलीकडे बघत
सानिकेच्या सुरात
सांगतेस तू........
....... माझ्या मनाच पाखरु
....... भाबडं वासरु...miss U !!

आसवांशी खेळाताना
आठवांना हसवत....
पापणीच्या पदरात
सजतेस तू...........
खळ्यांमधे लाजताना
कळी बनून सजताना
हुंदक्याच्या धुक्यात
बोलतेस तू.........
........... माझ्या मनाचं पाखरु
.......... भाबडं वासरु..miss U !!

प्रश्न !!

या इथे मी सोडतो माझ्या खुणा
शोधशील तू नव्याने, राधिके, मला पुन्हा !

आज ही ती गात आहे, गोकुळात सानिका
सावळ्याची सावली की, शांत क्लांत मृत्तिका
भोवरा पायास माझ्या ग जुना........ १

पापणी बंद जराशी, आसवे गाली नको
जाणत्या वाटा तरीही, शापही भाळी नको
जाणता अजाणता हा का गुन्हा...... २

हीच वेळ...

हीच वेळ
आसवांना नाव देउ
हीच वेळ
भावनांना गाव देउ
हीच वेळ
आसवांना गाव का रे ?
हीच वेळ
भावनांना नाव का रे ?
हीच वेळ
मैतरांना छत देउ
हीच वेळ
वेदनांना रीत देउ
हीच वेळ
मैतरांना रीत का रे ?
हीच वेळ
वेदनांना छत का रे ?

निराश झालो नाही..

जरी अडकलो, पुन्हा नव्याने,
काही सांगणे नाही
जरी घसरलो, आज पुन्हा,
वळून पाहणे नाही !

तुटले, सुटले, किती सवंगडी,
केली ना गणती
डोळ्यांमधे ध्यास ठेवला,
मनासही कळले नाही !

गझलेसाठी आज बैसलो
गझल नाही जमली
गीतामधे अडकुन गेलो
निराश झालो नाही !

इतकच !

इतकच !

मित्र आहेत काहीच
कुणी सरळ सांगते
कुणी सांगत नाहीत
इतकच !

कुणी उगाच नाचतात
कुणी गालात असतात
मोठ्यांनं बोलत नाहीत
इतकच !

सीमारेषा आपण आखतो
स्वातंत्र्य आपण चाखतो
इतरांची आठवण येत नाही
इतकच !

मित्रा, मी तुझा आहे,
नक्की
तू पण माझा आहेस,
नक्की
अल्याडचा मी पल्याड येत नाही
इतकच !

साधासा अनुभव..

साधासा अनुभव... पण उदास करणारा..

काल एक झाड पडले
वठले होते
कुजले होते
पानांशिवाय
सजले होते......
कोसळून पडले
उसळून पडले...
पालिकेची माणसे आली
आपले काम करुन गेली
मी ओला कच्च
आठवाचे पिशाच्च..
लहानपणी खेळलो होतो
झाडापाशी रडलो होतो
झाड माझा भोज्जा होता
लपण्याचा सज्जा होता
झाड माझे स्ट्ंप्स होते
फ़ांदी... मंकी जंप्स होते
झाडापाशी भेटु बरका
झाडामागे थांबु बरका
झाडाविना वठलेल्याही
आज झालो आहे पोरका......
कोसळून पडलं कोणं..
झाड का मी ?
उन्मळून तुटलं कोणं
झाड का मी ?


त्याच्या तुटलेल्या खोडातुन डोकावणारी
माझी जुनीच खोड....
खडुने त्याच्यावर लिहीण्याची....
आणि वाळलेल्या पारंब्यात
माझ्या भुतकाळाची....
गंजलेली दोरी..
सारं सारं..
तुटलेलं
उन्मळून पडलेलं.......!!

ते पडलं
त्याच्या सकटं
काही घरटी पडली....
काही उडून गेली......
मनात फ़क्त
चिवचिवाट
किलबिलाट
...................गोंगाट !
दोन सुरांमधल्या सुराचा
एक अस्पष्ट कलकलाट !!!

ऐकतेस ना ?

जगत असताना अनेकवेळा काही नाजुक नाती मिळून जातात. एकदम पारदर्शक असतात. मात्र दवबिंदुसारखी क्षणभंगुर नाही.. तर मनावर कोरली गेलेली असतात. या नात्यांना देवाचा आशीर्वाद असतो आणि आभाळाची सावली असते !!


ऐकतेस ना ?

नाती बनत असतात ग
वाती जळत हसतात ग
श्वासालाही भार असतो,
आरसे खोटे बोलतात ग !!

हातामधे हात कशाला
थरथर उगा नाचती ग
डोळ्यांमधे अधे मधे
ओले मोती साचती ग !!

नात्याला या नाही नाव
अनिकेत फ़िरते ग
श्वासामधे, भासामधे
ठेक्यामधे उरते ग !!!!

तुझी सय, ऐक सई
मना मधे येते ग....
गिरकी घेते, निळी सावळी
होत पाखरु.. गाते ग !!


नाही मोजमाप लावलं
तुझ्यामाझ्या नात्याला....
कशाला उगाच
शापायचय ग......
या.. देवाघरच्या मातीला ?
आंदण मिळाल्यावर गप राहवं....
उगाच प्रश्न कशाला....
उभे आडवे
वाकडे तिकडे
सवाल जबाब कशाला ?

बदल..

त्रेतायुगातही पाउस पडताना
टप टपच आवाज येयचा.....
पावसात फ़रक इतकाच
......................................की आज आपण भिजतो
......................................पूर्वी पुरूषोत्तम भिजायचा !!

जुन्या कवितांना कुरवाळताना
कवितेलाच मी कळायचो,
कविता वाचत असताना
डोळ्या मधुन गळायचो !
आज मलाच कविता कळते
अलगद पणे हातात येते,
इतकी बाजारू झाली आहे
ज्याचा त्याचा रंग घेते....!!
बदल कशात आहे..
तिच्यामधे का माझ्यामधे
पूर्ण होतच नाही ती
संपून जाते........ अधे मधे...!!

शमीचं झाड....

शमीचं झाड....

प्रत्येकावर ही वेळ येतेच
हारता हारता जिंकण्याची
किंवा नकळत हारण्याची
नामुष्की ही येतेच...!!!!!

शस्त्र नकोत, अस्त्र नकोत
ब्रह्मविद्या नकोच नको,
शिष्टाई करणारा तो
देवकीनंदन नकोच नको..!!

थोडं थांब, सबूर सबूर
एक शांत गाव हवं,
प्रत्येकाच्या आयुष्यात
एक शमीचं झाड हवं....

सावळ्याचे मरण...!!

आपल्या मनात असणा-या भावनांचा मान ठेवतच कधी कधी पुराणाकडे इतिहास म्हणून बघताना काही वेगवेगळ्या गोष्टी दिसू शकतात. यामधे भावना दुखाविण्याचा हेतू नसतोच.... असते ती कवि कल्पना... ईश्वराला साक्षी ठेवत त्याच्या अवतारातील काही मानवी पदर उलगडाण्याची.......

सावळ्याचे मरण...!!
एक प्रश्नचिन्ह..!!

फ़ाळभर घुसलेल्या भाल्यासारखे
रूतुन बसले आहे
आपल्या सर्वांच्याच हॄदयात..!!
कर्मण्येवाधिकारस्ते....
पाठ करताना नाही कळलं...
पण अर्थ कळाला आणि मस्तक भणभणलं....
सुभद्राहरण, जरासंधाचा वध
पादाक्रांत केलेला मगध...!!
एकमेवाद्वितीय कुरू घराण्यावर घातलेली मोहिनी.....
आणि यशस्वी केलेले सारथ्य...
भारतातल्या महाभारताचे.....!!!
कर्मण्येवाधिकारस्ते..???
नसता मेला जयद्रथ...
नसता आला शिख्ंडी तर
देवव्रतासमोर नागडे झाले असते
सावळ्याचे पांडव..!!
राधेय तुडवला गेला आणि द्रौपदी बटीक होयची वाचली..
सारं माफ़ असतचं तिथे... मान्य..
पण झेंडा कशाला मग.. कर्मण्येवाधिकारस्तेचा..?
फ़ेडायला लागलं त्याला..
कोणा भिल्लाच्या बाणाच्या टोकावर बसुन यम आला
क्षिरसागरातले सुदर्शन परत नेण्यासाठी...
ठिपकत ठिपकत मेला माझा सावळा....
यशोदेची मायेची फ़सवणुक
राधेची समाजातली मानहानी...
हजारो श्वासांच्या कुरूक्षेत्रामधल्या आहुती ...
सारं सारं भोवलं त्याला..
समोर बुडाले यादव...
गंजुन गेलं सुदर्शन...
सडुन गेली बासरी...
परक्या हाती मरणं..
आणि बेवारस प्रेतासारखी विल्हेवाट..!!!!!!
असा शेवट महाभारताच्या विश्वकर्म्याला..?
पटत नाही ना..
सत्य आहे......
आपण षंढ.... डोळे झाकुन बसलेलो सारे....
स्विकारायला हवं हेही रूप माझ्या
लाड्क्या सावळ्याचं....!!

साधीभोळी कविता

साधीभोळी कविता :

माझी कविता घाबरणारी
समाजाला
बिचकणारी....
कोणी डोळे मोठे केले
तर कोप-यात जाउन
हिरमुसणारी...!!
तिला शाप खरेपणाचा
कणा कणानं वाढत जाउन
ब्रह्मांडाला वेडावण्याचा....
कणा कणाने वाढते..म्हणुन,
तिचा कणाच मैच्युअर् होतो...
कवितेचा श्वास,
भासात सिक्युअर होउन जातो...!!
आहे तशी आहे
माझी कविता......
आहे तशीच राहणार
माझी कविता......
तिला पश्चिमेचे माप नाही
बदलण्याचा ताप नाही.....
ब्रह्मदेवाच्या कमंडलूतले तीर्थ आहे ती....
तिला आकाराचा शाप नाही..!!
पण म्हणुनच पापभीरू.......
ब्रह्माचं नात असल्याने....
सोडता येत नाही
वेशाला.......
तोडता येत नाही भाषेला.....
............हा मात्र शाप माझ्या कवितेला...!!
मवाळ राहुन मवाळ जगण्याचा !!
शब्दात राहुन शब्दात तगण्याचा !!

माझी कविता ....

कविता, कविची कोण ? कुठल्याही कलाकृतीचे आणि कलाकाराचे नाते काय ? प्रियकर-प्रेयसी पासून, बाप-मुलीपर्यंत याबद्दल लिहीलेले आहे. हे माझे असे माझे मत..... माझी कविता, ही माझी मुलगीच ! सखी... चालेल, पणा प्रेयसी नक्की नाही !! बघा पटातय का ?

माझी कविता ....

कवितेत माझ्या झुला
जसे निरागस बाळ...
कधी उंब-यावरती
दडा धरलेला काळ..!!

माझी लाडिक वेल्हाळ
जसा यशोदेचा कान्हा
कवितेत भावनांचा
भरलेला निळा पान्हा !!

इथे नाहीत आरोप
नाही घेतलेले वेष
कशासाठी दुस-याचा
ओढवेल उगा रोष..!!!!

माझा आरसा आरसा
माझी होतसे ती शाल
नाही कधीही कधीही
बनणार तिची ढाल...!!!

माझ्या कवितेत रूपे
दुर्गा, शक्ती, महाकाली
जरी शारदा सोज्वळ
सुप्त सुक्ते तिन्ही काळी !!

जेव्हा निंदाल कविला
माझे मन करपेल....
माझ्या मढ्यासाठी तुम्हा
माझी कविता शापेल...!!

कसे पाहील कविता
माझे जळते सरण...
बघवत नाही कोणा
असे बापाचे मरण !!!

संन्याशाचा पोर....

दोन महान तत्वांचा संवाद, त्यांच्यातल्या ईश्वरतत्वाला प्रणिपात करुन......

संन्याशाचा पोर.....

असाच आलो होतो चरफ़डत
स्वत:वर आणि जगावर...
वाटलं, भिरकावून द्याव सारं समोरच्या
इंद्रायणीच्या पात्रात आणि
शांत विलीन व्हावं
भगवंताच्या श्वासामधे.....
धाडकन लावली कवाडं...
बंद केली गवाक्षं.....
आणि मोजत राहीलो
ओवीबध्द अवतरणारी,
ब्रह्मवॄंदाची आवर्तनं.......
बंद केल्या ताटीच्या दारापाशी
आलीच नाही मुक्ता आज....
गायलीच नाही ताटीचे अभंग..!!
विषण्ण हसली ती.....
काय संगू रे, बोलली ती
आई, बाबापण हरले आपले
संसाराच्या वेदीवर.....
नसेल जमत कोड्गं होउन जगणं....
तर जा बापड्या, जा पुढं...
आम्ही येतोच मागुती...
असू देत दार बंद...
विचारतो कोण संन्याशाच्या पोरांना....!!!
मी तसाच बंद दाराच्या आत
आणि मुक्ता बाहेरच,
मला तिलांजली दिल्यासारखी..!!



मी मुक्ताई
मुक्त....
एक टिंब.. पूर्णविराम,
आपेगावच्या कुलकर्ण्याच्या एका पिढीचा.....!!
इंद्रायणीच्या पात्रात सोडलेलं एक बिल्वदल
आणि
नेवाशाला झालेल्या विश्वरूपदर्शनाची
एक निस्सीम भक्त....
मी मुक्ताई..... मुक्त !!
आकाशाची तहान होती दादाला
नेवाशाला प्राशन केलं प्रारब्ध
आणि उरला
अवनीवरती एक चमत्कार.....
दादा पसायदान मागत होता..
तेव्हाच त्याच्या डोळ्यात होती
अनेक शून्य
आणि मोठा पूर्णविराम......
कारण नंतर जगायला
कारणच नव्हते..... आम्हा चौघांना !!!
आकाश प्यायल्यावर अजुन गिळण्यासाठी आहे तरी काय ?
असो.....
अजुन् सुरू आहे पसायदान......
उद्या कोणी पाहिलाय ?
पण एक माहिती आहे मला
मी मुक्ताई....... मुक्ता !!

फ़्रिज....

असं तुमच्या आयुष्यातही घडू शकेल......


फ़्रिज
आठवणींना हातात घेउन
बोलत होतो.....
बरच जुनच...
पुन्हा नव्याने सांगत होतो...
हसत कण्हली आठवण
म्हणली......
आत्ता नको
खुप दुखतय मनात
इतकं नको !!
नंतर बोलूयात....
माझ्या गळ्यात दाटलेला हुंदका
आणि मखमली आवाजाची थरथर
तिला जाणवली.....
काळी पाच मधे पोहोणा-या सुराला
सा पण नाही लावता येत.. ?
आठवणच उसवली......
मी पण बोललो........
इट्स ओके ग....
उद्या बोलू......
ओरखड्यांना पुन्हा झेलू !!
हसली ती पण...
म्हणाली मला.. शांत आणि नीट ठेव मला........
कुठे ठेवशील तो पर्यंत..... ?
मी निर्लज्जासारखं उठलो......
फ़्रिजच दार उघडल....
आणि शिळ्या चपात्यांच्या बाजूलाच
या आठवणींचं बोचकं सरकावून दिलं....
राहील च्यायला... आता किती दिवसही फ़्रेशच !
आणि झालाच कडक दगड.... तर
मायक्रोवेव्ह आहेच की......
तिला तापवायला........ !!
राहू देत..
जाईल कुठं ?



काल जरा कंटाळा आला
वर्तमानाचा आणि अचानक
आठवण आली त्या बोचक्याची....
लगेच फ़्रिजचं दार उघडलं
आणि हातात घेतलं ते थंडगार
बोचकं आठवणींचं !
उघडलं......,
आणि बघतोय तर काय ?
सगळं कडक आणि गारढोण !!
मी हलवून पाहिलं...
च्यायला,
दगड कधी गदगदेल का ?
त्या थंडगार दगडात,
माझी आई होती.... माझा बाप...
आणि माझा भूतकाळ.......
दगड झालेली गार आणि थंड आई !!
शांत झालेला बाप.......
आणि कोप-यात निपचीप पडलेलं
माझं.. शुभंकरोति !!
ए, आई.... मी हाक मारत होतो.....
बाबा...... मी किंचाळत होतो...
माझं आठवणींच बोचकं...
पाण्यातून ठिपकत होतं.....
मी धावतपळत मायक्रोव्हेव ओन केला......
अनिमीष बघत होतो......
वितळत जाणा-या माझ्या बालपणाला....
घेतल हातात....
बघतो तर काय ?
चिवट... वातट...... चिकट......
आणि मधूनच कोरडा झालेला
माझा भूतकाळ....
ठिसूळ आणि चिवट......
करपून गेलेली आई
आणि कोळसा झालेला बाप !!
शास्त्र फ़सलं होतं.................
आठवणींचं बोचकं.....
मला एकट्याला टाकून पुन्हा
फ़्रिज मधे निपचीप निजलं होतं !!!!



काल बराच वेळ दिवे गेले होते....
मी उकाड्यावर वैतागून बसलो होतो....
अचानक,
पन्ह्याचा ग्लास घेउन ती आली.....
काय ग ? मी किंचीत आश्चर्यचकित....
चक्क लाजली
थैक्स् हो.....
अस काहीस कुजबूजली....
माझ्या छातीवर डोकं घुसळत
काहीसं पुटपुटली........
आज मी तुमच्या आवडीची उसळ करतीये ह्म्म्
आणि तशीच... झुळूक म्हणून निघून गेली.....
मी जाग्या जाग्या निद्रीस्त...
नंतर ग्लास ठेवायाला आत गेलो.....
दिवे नसल्याने
सारा फ़्रिज पाणी पाणी झाला होता.....
ते माझं बोचकं तिथच बाजुला......
आणि पाणी झालेल्या आठवणीत
तरंगर होती.......
मी तिला पूर्वी लिहीलेली पत्रे....
पण भीडेखातर कधीच पोस्ट न केलेली !!!


आज
थालिपीठ जास्तच खमंग
झाले होते.....
एकदम झक्कास...
माझ्या सांगलीची आठवण
करुन देणारे.....
मातीचा वास होता.....
आणि चव तर.... एकदम फ़ंडू.....’
काय ग ... ?
कस्लं... झक्कास जमलय ग.....
मी बोललो.....
हसली ती...
कपाळावरची बट
हलक्या हातानी बाजुला करत
हसली ती.........
कशाला तरी फ़्रिजचं दार उघडलं तेव्हा
पाहिलं.....
नरसोबाच्या वाडीतले माझे जुने फोटो.....
आणि कृष्णाकाठचा गोंधळ.......
कोल्हापुरचा संबळ......
अंधुकसे दिसत होते................
फ़्रिजमधल्या ताकालाही
मंजि-यांचे तुरे फ़ुलले होते !!!!!!!!!!!!

ताजमहालातलं मरण......

आजच्या उच्च मध्यमवर्गीयांचा अंत... एक अंतिम सत्य !!

ताजमहालातलं मरणं.....

जगणं तर थाटात जगलोय,
वेडे
माझं मरणसुध्दा राजासारखच..... सिंहासनावर ! राजवाड्यातच !
मात्र मला घाबरत घाबरत.. बिचकत बिचकत
मुंगीच्या पावला पावलानं येणारं..... !
इथे,
मोठ्या होस्पिटलातले उच्चशिक्षित म्हणणार...
ही इज क्रिटीकल... व्हेरी सिरियस.....
आणि मग माझा मुलगा
लंडनहुन येई पर्यंत....
माझं प्रेत लढत राहणार...
नाकातोंडात...........
सळयाआणि नळ्या लाउन
त्याची वाट बघत..... !

यमदूताला सांगणार मी..... जा जरा चहा पिउन ये,
उद्या येतय माझं कोकरू..... मग आलोच मी.....
मी ओळखतो त्याला.....व्यवस्थित !!
तो येणार
मला बघणार... आईच्या फ़ोटोपुढे बसणार....
त्याचं रिटर्न तिकीट कन्फ़र्म करणार..
आणि विषण्णपणे म्हणणार...... त्या होस्पिटल स्टाफ़ला...

थैंक्स..डोक्टर्स... फ़ोर् एव्हरीथिंग...... आय एप्रिशियेट ऐंड् आय थिंक
व्यु शुड ओफ़ दी रेस्पिरेटर.....
आणि मग कुठलासा स्वच्छ चकचकीत वार्ड बोय येउन.....
निर्ढावलेल्या शहरी हाताने
माझी नळ्यांची बटाणं बंद करणार...............
सारा सारा असा......... आर्टीफ़िशीयल मामला......
ताजमहालातलं मरणं.....
हेच माझं आयुष्य.......
सुशिक्षित उच्चमध्यमवर्गीयांचं...!!!
आहे काही दुमत ?

मान्य मला पोरा
तू नाहीस निर्दयी....
नाहीस पाषाणहॄदयी....
माझा आरोप नाहीये तुझ्यावर,
मीच
माझ्याशीच बोलतोय....
सत्यकथन आहे.....
सत्य हे उघडं वाघडच असतं........
विद्रुप.......
ते बघायाला पण धाडस लागतं.......
माझी पिढी तुमच्या एव्हढी धाडसी नव्हती...
कधीच.....असो......

आमचं मरण आमच्या लक्ष्मणरेषेच्या आत...
कुढत कुढत,
गावातला म्हसोबाचा उरूस आठवत,
तुझ्या जन्माच्या वेळने नवस फ़ेडलेत की नाही
याचा जमाखर्च करत... असाच.. तुझ्याच मांडीवर..

आणि कोकरा तुम्ही.... ?
तुम्ही क्षितीजाला मुठीत घ्यायचा प्रयत्न करताना
त्या भास्कराच्या दाहाने करपणार...
शरीरानं.... मनानं.....
हा ज्याचा त्याचा शेवट रे...
त्या सटवाईने लिहून ठेवले

श्री स्वामी समर्थ !!

श्रीस्वामी समर्थांचे मला भावलेले रुप...

तू, निळ्या मेघातला निराकार वेग
तू, जणू सावली, सद्गुरू, माझे जग
तू, भास माधवाचा, त्रिगुणी कृतार्थ
तू, भास्कर, मार्तंड, श्री स्वामी समर्थ !!

तू, अमृत चंदन, त्रिखंड पालक
तू, सावळा, सोवळा, ब्रह्मांडनायक
तू, अथांग, अद्भूत, अनंतकोट ..
तू, अक्कलकोटी, शतसूर्यांचा झोत !!

तू, अकार, मकार, गकार राजस
तू, ओंकार, प्रवाळ, सगुण तेजस
तू, नेणिव, राणीव, जाणीव चाहूल
तू, योग अवधूत, ब्रह्मांड पाउल !!

चंद्र...

खिशामधे चंद्र आला
आला म्हणजे,
कोंबला त्याला.......
बस्स् म्हटले गप् गुमान
दाबून दाबून,
भरला त्याला............
कोंदट आहे, बोलला तो
वास येतोय घामाचा
अजागळ आहेस लेका
तू काय कामाचा ?
चंद्रा, गप्प गुमान बस
उगा वळवळ करु नकोस
कळकट माझ्या शर्टाला
अशी नावे ठेवू नक्कोस... !!
ल्येका, माझ्या मुळं आहेस तू
माझ्याच जगात राहतोस तू
माझ्याशिवाय रस्त्यावरती
भिका मागत फ़िरशील तू.....
जा... जा......
जाउन सांग प्रतिष्ठितांना
उच्चवर्गीय संशोधकांना
लांबलांब गाडीवाल्यांना
सांग त्यांना आलोय मी...
मी चंद्र....
मी चंद्र.....
हसत हसत म्हणतील ते....
पृथ्वीच्या उपग्रहा....
सूर्याच्या परावर्तित प्रकाशाच्या दानावर जगणा-या
बांडगुळा....
आत्ता नको... आत्ता जा.....
अजून तुझ्या सोइलचा एनैलिसीस करतोय
तुझ्यावर पीएचडी करतोय......
अपौंट्मेंट घे अन् उद्या ये..... !!!
ए चंद्रा,
ये इकडं...
जाउ तिकडं....
पुलाखाली माई आहे
झोळीमधं तान्ह आहे
झोका देतेय पिल्लाला
गळ्यामधे गाणं आहे.....
तिच्यासाठी शास्त्र
सोप्प सोप्प सोप्प आहे
तुझं नाव तिच्या घरी
देवाहुनही मोठ्ठ आहे.....
झोळी मधे बाळ
ओले ओले गाल
बाळाला खळी
खळी मधे तू..........
गळ्यामधे तान
झिरपणारं रान
निशीगंधी भान
भानामधे तू...........
बोल मित्रा..
तू कोणाचा ?
कोणासाठी
काय.. नावाचा ?

Friday, August 14, 2009

गप्पा मृत्युदेवतेशी......

गप्पा मॄत्युदेवतेशी....!!
ती येते आणि म्हणते, चला आता माझ्याबरोबर... तेव्हाचे काही क्षण !!

शरपंजरी आज मी..एक दक्षिणायन ! या ऒर्कुटवरील स्पंदन काव्यशृंखलेच्या पुस्तकात असणारे, रविंद्र साठे यांनी गायलेले हे भीष्माचे मृत्युगीत......
संगीत : प्रशांत कुलकर्णी !!

येतो तोडुनी धागे सारे, तुझ्यासवे मी लांब,
अडले पाउल उंब-यावरती, येतो, पळभरी थांब..!!

मातीमधली माझी नाती
शांत दिव्याच्या मंगल ज्योती
ज्योतीला का अंधाराचा
कधी लागला थांग.... येतो, पळभरी थांब !!

तुझ्या कुशीत निजुन माउली
ओढुनी घ्यावी निळी सावली
कुठे होतीस माय माझी ग
आजवरी तू सांग..... येतो पळभरी थांब !!

उरले केवळ प्रश्नच आता
नुरली गीता, नुरली सीता
थरथरणा-या आसवाचेही
तुला मागतो दान..... येतो पळभरी थांब !!

अंधार धार...

धनश्री गणात्राच्या संगीताने नटालेली आणी रविंद्र साठे यांनी अप्रतिम गायलेली, माझ्या आजवरच्या रचनातील अतिशय आवडती रचना.........

अंधार धार कापणारी, आरपार दृष्टी दे
जे अचेत हो सचेत, अनिकेत वृष्टी दे

अश्रु शिंपता फ़ुले ही, बाग याला पुष्टी दे
येता भरास हा प्रकाश, पेलणारी सृष्टी दे

सावळ्याच्या सावलीची, अविनाशी भक्ती दे
जहाल जाळ, हलाहल, शोषणारी शक्ती दे

पांडुचं षंढत्व... !!

मध्यमवर्गीय माणसांचे आयुष्य !!!! पण हेच खरे जगणे आहे.. सहनशक्ती आणि जगण्यावरचे प्रेम हेच आयुष्य !

पांडुचं षंढत्व,...........????


मनात होतं भिरभिरणारं पाखरू
नजर लाउन बसलेलं
उंच नभाकडे.............. !!
डोळ्यात वासनेचं पिशाच्च
नजर लाउन बसलेलं
जुन्या वडाकडे............. !!
तू आलीस, हसलीस, बसलीस
मला तुझा समजलीस...
माझ्याच मनाची तडफ़ड
मनातल्या पाखराची फ़ड्फ़ड...!!
काय करू
काय करू.......
तुझी नजर, तुझ्या खळ्या...
एकाच क्षणात चेतणारे लामणदिवे...
आणि मिणमिणत जाणारे
माझ्या स्वप्नातले कोवळे रावे......
का हात थरथरतात....
का डोळे बावरतात....
का मन अडकत आज हो नाहीच्या झोक्यावर
का काळिज हुरहुरते.... तारुण्याच्या ठोक्यावर.....!!!
या नव्या भावना
म्हणजे माझ्यातल्या माणुसकीचं.... तत्वांचं दर्शन...?
माझं माणुसपणाचं कतॄत्व.....
का
शाप म्हणुन आलेलं पांडुचं षंढत्व,...........????

खुपदा वाटतं हात उगारून
समोरच्याला मारावं.......
आई माई करत झक्कस
बुकलुन काढावं..........
शब्दांची डबकी माझ्याकडे पण
तत्वांची मडकी त्याच्याकडे पण.....
पण
पण
अचानक, लहानपणी म्हणलेले
शुभंकरोति आठवते
भीमरूपीचा आवाज कानावर येतो
मीसुध्दा भानावर येतो......
स्कुटरला कीक मारतो आणि घरी जातो,
बाल्कनीत माझा चिमणा उभा असतो
वाट बघत....
स्वयंपाकघरात ती असते, भजी तळत...
आणि टीव्ही समोर माझी आई......!!
हा चौकोन तोडु कसा..
घेतला वसा टाकु कसा....?

आय लव्ह यु.... सगळ्यात सात्विक पध्दत !!

तिळगुळाची अट नाही....

म्हणलीस
आज संक्रांत....
गोड बोल.....
का नाही बोलत...?
बोल ना...
काही तरी बोल.....
हसलो, म्हणलो....
इतका मी स्वार्थी नाही
तुझ्यासाठी
तुझ्यासारखा मी काही
हट्टी नाही....
तुझ्यासारखी सा-या जागात....,
गालावरची खळी
आणि कपाळावर बट नाही
तुझ्याशी गोड बोलण्यासाठी
तिळगुळाची अट नाही....

मी आणि गावसकर !

प्रत्येकाचे काही आदर्श असतात.. तसाच माझाही ! मी कधीही कोणाचा फ़ैन नव्हतो..आणि नसणार.... मी असतो भक्त... माझ्या देवाचाच ! ही मानसिक कमजोरीही पण जगण्याचे अमृतही..!!


मी आणि सुनिल गावसकर

नाही नाही चिडू नकोस
थांब जागच्या जागीच
आरडा ओरडा नको
वेळ आहे साधीच..!!

डोळ्यातली स्वप्ने
करायची जर खरी
खुप काहे लागते
ताकदीशिवाय उरी !!

चिडलास तर तेथे
हारशील फ़ुकाचा
स्वप्नांचं काय मग...
सांग दोष कोणाचा !!

थांब जरा श्वास घे
लांब लांब पाहा
पेशन्स मित्रा पेशन्स
जरा थोडी वाट पाहा..!

फ़ेक हळू फ़ासे
कोणा बोलू नकोस
सारेच आहेत शत्रु
कमी तोलू नकोस..!!

कोणी म्हणेल घाबरट
कोणी म्हणेल डिफ़ेन्सिव्ह
काहीच नाही अर्थ
उगा होण्यात ओफ़ेन्सिव्ह !!

कधी चटका बसेल
कधी जळेल लेदर
एक शास्त्र लक्षात ठेव..
बैट पैड टुगेदर...!!

जिंकुन देइल तुला तुझ्या
विचारातील शक्ती....
आयुष्यात जिंकुन देइल
फ़क्त, सहनशक्ती...!!

बोलण्यामधे त्याच्या होत्या
नुसत्या फ़ोर्स आणि सिक्सर्स
माझा आयडोल बोलत होता
.. माझा सनी गावसकर..!!!!
......................................life is like that !

मला भेटलेला शहेनशहा..अमिताभ !

अमिताभ बच्चन आणि मी

परवा भेटले अमित अंकल
सहा फ़ुट शहेनशहा,
दीवार-शोले-एंथनी,
अभिमान बादशाहा !!

म्हटले काका, लिहीतो मी
गद्य पद्य हाणतो मी....
आशीश द्या अमितजी
प्रोफ़ेशनल वागतो मी !!

चाळल्या काही कविता
हसुन खर्जात बोलले ते
आई शप्पथ...जगलो मी
मनात शब्द घुसले ते...!!

मला म्हणले डियर बच्चा
साच्यामधे अडकू नकोस
कैलिडोस्कोप हो बाळा
लिहीत राहा सारे सकस !!

प्रेम-भक्ती-शक्ती लिही
प्यार-मार-यार लिही
आई-ताई-बाई लिही
तारे-वारे-सारे लिही....!!

प्रेमकवी बनु नकोस
देवदास होउ नकोस
पिटामधल्या टाळ्या घे
पोटासाठी लिहू नकोस !!


सारं सारं सारं लिही
उंब-यामधे राहु नकोस
सागर बन कवितेचा
नाल्यासारखा वाहु नकोस !!

थैंक्स म्हणले बच्चन दा
टाईपकास्ट होणार नाही
लिहीन सारे, वाचेन सारे
एकसुरी होणार नाही.....!!

जुग जुग जियो बोलले अंकल
ठेवला हात डोक्यावरती
कभी कभी मेरे दिलमे
उगाच विचारांची भरती.....!!

तेंडल्या आणि मी

प्रत्येकाला एकदा तरी असा सचिन भेटणे आवश्यक आहे !!

सचिन तेंडल्या !!

पूर्णपणे हारलो होतो
कोप-यामधे बसलो होतो
डोळे सुजले, मान झुकली
ररडरड रडलो होतो....!!!!

झालो मोकळा मनापासुन
भावना होत्या कोंडल्या...
जीव देण्या चाललो होतो
समोर आला .. सचिन तेंडल्या !!

का रे मित्रा बोलला तो
मान का झुकली आहे
अपयशाचे अंकगणित
कधी कोणा सुटले आहे ?

नको रडुस, चल उठ
ताठ उंच उभा राहा
मावळणारा सूर्य बघ
त्याच्याकडे रोखुन पाहा !

सावली सुध्दा लांब जाते
पक्षीसुध्दा घरी येतात
सागरलाटा बारीक होत
आत आत निघुन जातात....!

अरे लोकं बोलतातच
हारल्यावरती टोचतातच
जिंकल्यावरती डोक्यावरती
घेउन बेभान नाचतातच !

उतू नकोस मातू नकोस
घेतला वसा टाकू नकोस
जर तुला माहित आहे
कधी अपयश टाळू नकोस !

सूर्याची शपथ घे
मावळून पुन्हा पूर्वेची
ओहोटीत न रडता
भरतीवाल्या दर्याची !!!

जिंकशील मित्रा खरं सांगतो
माझ्यावरती विश्वास ठेव
आरशाशी तू खरं बोलं......
बाकी सारं पाहिल देव !


चल उठ वरती बघ......
माथी सूर्य तळपत आहे
क्षितीज हारणार तुझ्यापुढे
नजतेत सारे झळकत आहे !

मात्र एक लक्षात् ठेव
जिंकल्यावरती विसरू नकोस
मातीला आणि आईला
कधी अंतर देउ नकोस...!

थैंक्स सच्च्या, म्हणले मी
हसत हसत निघुन गेला
एकलव्यासाठी तेंडल्या
द्रोणाचार्य बनुन गेला.....!!

बैठकीची खानदानी लावणी

बैठकीची खानदानी लावणी !!

पहाटेला जाग आली, झोप चुरली
माझ्या श्वासामधे तुझी, कथा उरली !!

सोडलेले केस, पाठीवर मोकळे
पापण्यात बंद, ओले कच्च शिंपले
उशीखाली कासाविस, सजा उरली १

स्पर्षाने दाहक, पदरात चेतली
सूर्या आधी, चांदरात, काल मातली
अंगावरी माझ्या, तुझी घुमे मुरली २

नको घेउस कवेत, राजसा पुन्हा
माझ्या उरात काहुर, सावळा गुन्हा
तुझ्या मिठीची निखार, सय उरली ३

मराठी माती....

मराठी माती, लेउनी माथी
उफ़ाळतो सागर,
इथे मांडला माय मराठी
महाराष्ट्र जागर !!

कधी पवाडा, ओवी, गोंधळ
कधी म्हराटी फ़टका
भगव्यामधुनी श्वास रंगतो
फ़डफ़डतो जरीपटका
सह्यगिरीतून खळखळणारी
म्हराट मोळी नाती
देशावरती किती उजळती
निळ्या सावळ्या ज्योती
परमेशाचा जणू शुभंकर, असे इथे वावर १

जेजुरीच्या गडी रंगतो
भंडारा पावतो
कोल्हापुरी आईपाशी
साकडे घालतो
अक्कलकोटी आहे माझी
मायेची सावली
तुळजा माई पाठीशी रे
सोन्याच्या पावली
टाळ, मृदुंगी, दुमदुमते रे, अवघे पंढरपूर २

मी चिरंजीव आहे....

मी चिरंजीव आहे.......

मी सह्याद्रीची ढाल
घेउनी फ़िरतो.......
मी सागरातली लाट
बनुनी तरतो........
मी बरसणारा मेघ
होउनी गातो.......
मी नक्षत्रांच्या गावामधला आहे
मी चिरंजीव, मी चिरंजीव आहे !

मी माउलींची ओवी
बनुनी जगतो........
तुकयाची मी गाथा
होउनी तरतो.......
मी रामसेतुचा दगड
होउनी वाहतो......
मी ब्रह्मलोकीच्या तीर्थामधला आहे
मी चिरंजीव, मी चिरंजीव आहे !

मी शिवबाची तलवार
होउनी जगतो.........
मी कृष्णाकाठी
माती मधूनी फ़ुलतो........
मी सायंकाळी
ज्योतीमधूनी उरतो.....
ब्रह्मसमयी मी, भैरवातला आहे
मी चिरंजीव, मी चिरंजीव आहे !

कवितांची रुपे !

आपल्या मराठी कवितेचे व्याकरण सोपे करण्याचा माझा प्रयत्न :


शब्दातून येते सारे
जसे नाजुक तरंग
मधुरता जेथ..,तिथे
ओवी आणिक अभंग... !!

जिथे घुसावेसे वाटते
कधी कुंडली रमल...
वाक्या वाक्यातुन वारे
तिथे गजल... गझल !!

जिथे सांगावेसे वाटे
वाटे जावे आत आत
शुध्दतेचे रूप घेतो
माझा भुजंगप्रयात !!

कधी वाटते माराव्या
मध्यमवर्गीय आरोळ्या
स्थळाकाळाच्या भानात
मग घुमती चारोळ्या !!

जेव्हा पिसाट वैराण
तांडवाचे रूप घेतो
माझ्या फ़ाटक्या मनात
क्षणी मुक्तछंद येतो !!

जे वाटते अतुट
ठावे ज्याला चालरीत
तिथे आधी उमटते
सोवळेसे भावगीत !

जेव्हा वाटे साद द्यावी
मस्तवाल व्हावे आज
ठेक्यावर झिंगावे रे
लोकगीताचाच बाज !

जेव्हा कधी वाटतसे
बदलावा हा पैटर्न
थिरकावे चिंब होत
मनी र्हिदम वेस्टर्न... !

मनामधे भिजताना
तुझी आठवण येते
डोळ्यातुन भरलेल्या
तिचे बालगीत होते !

जेव्हा मारवा दाटतो
निस्तेजतो तेजमणी
जेव्हा बोलवी उंबरठा
रूप घेते विरहीणी !

हातातुन सुटताना
जेव्हा काहुर माजते
भावगीताचे सहज
मग मॄत्युगीत होते !

जेव्हा वाटे गोड व्हावे
काही नको नवे गुढ
मेलडीच्य संगे ठेका
हाच मालिकांचा मूड !

जेव्हा आघात असावा
स्रोत झोकात साठावे
तेव्हा आर्या निवडता
केकावलीतून जावे !

जेव्हा वाटते शुध्दता
माझे माझ्यासाठी गाणे
मात्रा शुचितेची मग
स्वच्छ श्लोकात राहणे !

साधे सुधे मठ्ठसुध्दा
कधी लिहावे वाटते
जुने नाही, आज नवे
चित्रपटगीत होते.... !

साधे आणि सुमधुर
तत्व तरीही बाजारू
गुलजार, मजरूह
करावे त्यांना गुरू.... !

जेव्हा वाटते घालावी
एक हलकीशी शीळ
भेटकार्डांसाठी मित्रा
तुच नाजुकसा तीळ !

जेव्हा शब्दावर पोट
मस्त रचनाही होते
तुझ्या ओळींची रे दोन
आज जाहिरात होते !


जेव्हा एखादी कविता
काही विचार मांडते
शॄंखलेत तिच्या वेडी
पटकथा रे बनते !

जेव्हा पडते काव्यात
निळ्या सावळ्याची गाठ
कशा रुपक, यमक..
सोपे शब्द.. भेट थेट !

कधी नाजुक होवुनी
वा-या पा-याचाही भास
छोटे छोटे लडिवाळ...
पुन्हा पुन्हा अनुप्रास !

कधी ठेक्यासाठी सारे
कधी दादरा - केरवा
इथे आठव, साठव....
जेव्हा मनात पारवा !

जेव्हा समर्पित होतो
मागे उभा जगदीश...
स्वरातीत सुरमयी...
तेव्हा बनते बंदीश !

जेव्हा भुतकाळाचे रे
मनी वाजते संबळ...
घुम घुम मातीमधे
पिंगा, पोवाडा, गोंधळ !


जेव्हा वाटते फ़ेकावे
चाली रीतींचे जोखड
खुले आसुड ओढावे
मग रचुन भारूड....!!

जेव्हा जेव्हा खट्याळसी
तिची येते आठवण.....
गोकुळाची गाणी गावी
मस्त यावी गवळण !!


कधी ऐकसी यमन
शांत, शुध्द, शुभ्र रास
सोपे सोपे शब्द तुझे
नको टाकाउ आरास....


कधी जर आसावरी
खरी खरी तठस्तता
उत्तर रात्र रंगते
शब्दा दे प्रगल्भता....

स्मरशी तू मालकंस
तेजगर्भ तेजबिज
घुसणारे शब्द व्हावे
शब्द कसा..., जणु वीज !

जेव्हा ऐकसी सुंदर
दिसणारा मधुकंस
मनातले सारे सारे
शब्द व्हावे राजहंस !

जेव्हा जाणसी भैरव
स्फ़टिकता अनाहुत
शब्द, सूर, ताल सारे
आपोआप, शुचिर्भूत !


जेव्हा बोलावे वाटते
जाण आपोआप येते
मन गाभा-यात जाग
त्याची कविता रे होते !

नको काही सावरुन
नको काही आवरण
जेव्हा खरा तू स्वत:शी
मागे येते व्याकरण.....!

शांत कोजागिरी साठी
जेव्हा सजेल कोयरी
गादी बैठक लोडाची
तेव्हा करावी शायरी.....

जेव्हा एकसष्ठीवेळी
बोलशील रे सबंध
तिथे नसावी कविता
स्पष्ट वाचावा निबंध !!

तिच्यासवे बोलताना
वेणीमधे फ़ुले माळ
नको तिथे रे कविता
शब्द सांभाळ सांभाळ !

कधी जाहला सत्कार
नको काही शब्द नाद
जरा हुंदका दाटुन
म्हण मित्रा .. धन्यवाद !!