Saturday, August 15, 2009

चंद्र...

खिशामधे चंद्र आला
आला म्हणजे,
कोंबला त्याला.......
बस्स् म्हटले गप् गुमान
दाबून दाबून,
भरला त्याला............
कोंदट आहे, बोलला तो
वास येतोय घामाचा
अजागळ आहेस लेका
तू काय कामाचा ?
चंद्रा, गप्प गुमान बस
उगा वळवळ करु नकोस
कळकट माझ्या शर्टाला
अशी नावे ठेवू नक्कोस... !!
ल्येका, माझ्या मुळं आहेस तू
माझ्याच जगात राहतोस तू
माझ्याशिवाय रस्त्यावरती
भिका मागत फ़िरशील तू.....
जा... जा......
जाउन सांग प्रतिष्ठितांना
उच्चवर्गीय संशोधकांना
लांबलांब गाडीवाल्यांना
सांग त्यांना आलोय मी...
मी चंद्र....
मी चंद्र.....
हसत हसत म्हणतील ते....
पृथ्वीच्या उपग्रहा....
सूर्याच्या परावर्तित प्रकाशाच्या दानावर जगणा-या
बांडगुळा....
आत्ता नको... आत्ता जा.....
अजून तुझ्या सोइलचा एनैलिसीस करतोय
तुझ्यावर पीएचडी करतोय......
अपौंट्मेंट घे अन् उद्या ये..... !!!
ए चंद्रा,
ये इकडं...
जाउ तिकडं....
पुलाखाली माई आहे
झोळीमधं तान्ह आहे
झोका देतेय पिल्लाला
गळ्यामधे गाणं आहे.....
तिच्यासाठी शास्त्र
सोप्प सोप्प सोप्प आहे
तुझं नाव तिच्या घरी
देवाहुनही मोठ्ठ आहे.....
झोळी मधे बाळ
ओले ओले गाल
बाळाला खळी
खळी मधे तू..........
गळ्यामधे तान
झिरपणारं रान
निशीगंधी भान
भानामधे तू...........
बोल मित्रा..
तू कोणाचा ?
कोणासाठी
काय.. नावाचा ?

No comments:

Post a Comment