Saturday, August 15, 2009

माझी कविता ....

कविता, कविची कोण ? कुठल्याही कलाकृतीचे आणि कलाकाराचे नाते काय ? प्रियकर-प्रेयसी पासून, बाप-मुलीपर्यंत याबद्दल लिहीलेले आहे. हे माझे असे माझे मत..... माझी कविता, ही माझी मुलगीच ! सखी... चालेल, पणा प्रेयसी नक्की नाही !! बघा पटातय का ?

माझी कविता ....

कवितेत माझ्या झुला
जसे निरागस बाळ...
कधी उंब-यावरती
दडा धरलेला काळ..!!

माझी लाडिक वेल्हाळ
जसा यशोदेचा कान्हा
कवितेत भावनांचा
भरलेला निळा पान्हा !!

इथे नाहीत आरोप
नाही घेतलेले वेष
कशासाठी दुस-याचा
ओढवेल उगा रोष..!!!!

माझा आरसा आरसा
माझी होतसे ती शाल
नाही कधीही कधीही
बनणार तिची ढाल...!!!

माझ्या कवितेत रूपे
दुर्गा, शक्ती, महाकाली
जरी शारदा सोज्वळ
सुप्त सुक्ते तिन्ही काळी !!

जेव्हा निंदाल कविला
माझे मन करपेल....
माझ्या मढ्यासाठी तुम्हा
माझी कविता शापेल...!!

कसे पाहील कविता
माझे जळते सरण...
बघवत नाही कोणा
असे बापाचे मरण !!!

No comments:

Post a Comment