Saturday, May 22, 2010

माउली.... एक वैश्विक आश्चर्य !

पुण्याजवळ असणारे आळंदीचे संजीवन...... त्यांच्यासाठी !!


1.

आसवांची नदी भोळी, आठवांचा ऐलतीर
पैलतटी घरट्यात, एक सईवेडा पीर !!

मोग-याचा नाद त्याचा, परसात अंगणात
श्वासामधे एक झाला, पैलतीर, ऐलतीर !!

मावळत्या क्षितीजाचे, तोच एक निरांजन
कोणी म्हणे, प्रेषित तो, सावळासा मुसाफ़िर !!

मन गुंतले त्याच्यात, कोडे सुटता सुटेना
चंदनाचे संजीवन, त्याचे जाहले मंदीर !!


2.

त्याचा श्वास
अक्षरांचा
जाणिवांच्या
वेदनांचा

त्याचा ध्यास
राणिवांचा
नेणिवांच्या
भावनेचा

त्याचा भाव
आकाशाचा
अद्वैताच्या
राउळाचा

3.

मोगरा आताशा ! कळ्यांचा गुलाम !
जाणिवांचा राम ! कुठे गेला !!

प्राकृताची आता ! विकृत आरोही !
सुकुताची काही ! गूढ रुपे !!

वाटते मनात ! तुझीच सावली !
योग्यच जाहली ! संजीवन !!

तत्वांच्या मुळात ! तुळस बोचरी !
जाणिव लागरी ! झाली आज !!!

Monday, November 16, 2009

मन.. काही अलिकडचे काही पलिकडचे !!

मन शोधायाचे माझे राहून गेले
मन काठावरती, माझे वाहून गेले
मन केविलवाणे, कुरूप.., म्हटले कोणी,
मन दगड झाले, दगड झाली वाणी !!

ओंजळीत माझ्या आले होते काही
आठवणींचे ओले झेले काही........
ही कशी कोठूनी आली येथे गाणी
मनात विरक्त, एकाकी विराणी !!!!

मन शोधायाला अवकाशी वारा झालो
ही अवनी पाहुनी, सागर लंघुनी आलो
तो तेजगोलही भकास होता जेव्हा,
मन कापुरले ते.. पुन्हा पोरका झालो !!!

नाही ऐसे नाही... कन्फ़ेशन !!

जखम जाहली, नाही ऐसे नाही
घननीळ वेदना, नाही ऐसे नाही
डोळ्यातून हसता, खळ्यात ओले काही
घनगंभीर झरलो, नाही ऐसे नाही !

जगताना रुतलो, नाही ऐसे नाही
पैंजणात गुंतलो, नाही ऐसे नाही
मोगरा अनेकदा, माळूनी भोळा आलो
वासनेत समाधी, नाही ऐसे नाही !

शरीर कापड, कोणी बोलले काही
वस्त्रात अडकलो, नाही ऐसे नाही
या अद्वैताच्या वडा पिंपळाखाली
वस्त्राला विणले, नाही ऐसे नाही !

Friday, October 2, 2009

रात्र : एक नवा विचार !

रात्र : या विषयावर, तिच्या महात्म्यावर आपल्या ग्रंथात बरेच काही लिहीलेले आहे.

आपण रात्र म्हणजे केवळ, घाबरवणारा अंधार असा अर्थ घेत अनेक रचना करत राहतो आणी रात्रीला एक वेगळेच खलनायिकेचे रुप देत राहतो. मात्र, मन, प्राण आणि पदार्थ या तीन वेदिक प्रकाशस्रोतांना अभिव्यक्त करणा-या तीन कालरात्री, महारत्री आणि मोहरात्री या संकल्पनांपासून आपणा दूर दूर पळत राहतो.

रात्र : मला कळलेला अर्थ : जगतो निवेशनि ( ऋग्वेद, १ ३५.१ )......

ratree is the priciple of darkness.. or absorption of all lights..... its the transcedent mother concealing in her womb all manifest forms.....


रात्र : एक नवा विचार !

सूत्र आहे अंधाराचे, गोत्र ब्रह्मवेक्त्याचे
सार जीवनाचे आहे, मोह अभिषेक्त्याचे
रात्र आहे, अंधार नाही, डाव मांडतो जुना
गंजलेल्या कवाडांना, आज खोलतो पुन्हा !!

रात्र भोळी, सोवळी ती, कोवळ्या संवेदना
ती मुक्याने सोसते रे, साहते या वेदना,
नाही काळी, खाष्ट नाही, ती सुरांची यामिनी
वेदनांची झोळी तिची, ती मानीनी.. ती मानीनी !!

सोसूनी ती पोसताना, सूर्य सारा शोषते
ब्रह्मतेज, तेजगर्भ, गर्भदान साहते
अव्यक्ताची गर्भबीजे, श्वासात माउलीच्या
त्रिगुणाची राख होते, स्पर्शाने सावलीच्या !!

वस्त्र आहे अंधाराचे, खोल खोल आसावरी
अथांग आहे, गूढगर्भ, प्रकाशनाळ.. अधांतरी
सूर्य पिउनी, शांत सावली... आता श्वासाचे प्रस्थान
रात्रीच्या गर्भात नव्याने... पुन: उत्थान !! पुन:उत्थान !!!!!!!

Saturday, August 15, 2009

स्वप्नांच्या बेड्या..

लग्नानंतर अनेक गोष्टींमुळे अनेक हुशार आणि व्यासंगी मुलींची करियर कापुर होताना मी पाहिली आहेत. अशाच माझ्या अनेक मैत्रिणींसाठी....!!


स्वप्नांच्या बेड्या मिळतात
बाजारात,
नाजुक, मखमली, अष्टकोनी
आकारात !
तू हसतेस, माप ओलांडतेस
उंब-यात,
पंख ठेवुन आली असतेस
मखरात !
लाजत असते, कौमार्याची
चांदरात
तुफ़ान असते, असते श्वासात
अधरात !
ती समर्पित, तो कल्पित
धुंद वात
सातजन्माच्या अजरामर
बंधनात !
गच्च प्रेम वाहते तिच्याही
होकारात
स्वप्नांच्याच बेड्या वेडीच्या
नकारात !

लावणी..फ़डावरची !

डेरेदार भरजरी श्येला
तुझ्यासाठी..... ,
जीव माझा खुळा !!!!!!

वेलबुट्टीची जरतारी ल्याले
चांदन्यात ग, आजवरी न्हाले
राया तुझीच.. तुझीच झाले
अंगी रंभेचा, नाद लई भोळा १

चोळी अंगात रुतते ग बाई
आग पूनवेची, फ़ुलवित जाई
राया, तुम्हाला मुलखाची घाई
तुझ्या घाईनं.. , केला चोळामोळा २

वळण...

वळण संपते...आयुष्य शिल्लक राहते !!

या वळणावर
वळल्यानंतर
कळले काही
उरले नाही....
सरसरणारे
भिरभिरणारे
क्षण कोवळे
सरले काही.... उरले नाही !!

वळणावरती
अंधुकलेले
गुलाल पक्षी
धुरकटलेले.....
ठेक्यावरचे
जगणे होते
मातीमधले
गुरफ़टलेले.....
आठवणींची
आस लागली
श्वासालाही वळले नाही ... !!

वळणावरती
झुलविणारा
रांगडा झॊका
खेळविणारा.....
नदीकिनारी
वाळवणारा
क्षितीजालाही
खुळाविणारा.....
कधी संपला
काल बावरा
आज आताही उरला नाही ... !!

वळणावरती
सावरलेले
झकास मंदीर
आवरलेले.....
वळणानंतर
उरात काही
मनात काही
काहुरलेले......
आज इथे मी
जगात माझ्या
नाळ आताशा उरली नाही ... !!.

भावना..

आसवांना नाव नाही, भाव आहे
पापण्यांचा चिंब ओला गाव आहे

आठवात मोहरते, भान माझे
सावलीची, मावळती, धाव आहे

पैंजणात बावरले श्वास थोडे
मोग-यात गोंदलेले नाव आहे

या खळ्यांत ओल जणू गुंतलेली
मारव्यात गुंफ़लेला घाव आहे....

संध्याकाळ..

संध्याकाळ.. प्रत्येकाच्या मनातली निराळी !!


अल्लड रुप घेणारी.....

कधी बावरी, कधी लाजरी
असते संध्याकाळ....
कधी नाचरी, कधी बोचरी
असते संध्याकाळ....

कधी पूरिया, कधी मारवा
गाते संध्याकाळ....
कधी आठवे, कधी आसवे
न्हाते संध्याकाळ....

कधी अल्लड, कधी झिम्मड
होते संध्याकाळ....
कधी निखार, कधी फ़ुल्लार
बनते संध्याकाळ.....

तुझ्याचसाठी, तुझी होउनी
येते संध्याकाळ......
निमीषामधे, येते वेडी
जाते संध्याकाळ.......


उंबरठ्याची आठवण करुन देणारी..

ग सांज बावरे
तू ये !!

हुरहुरता श्वास
काहुरता भास
झाकोळती सय बनूनी ये !!

थरथरता ठेका
भिरभिरता झोका
रेंगाळता नाद बनूनी ये !!

सावलीची काया
माउलीची माया
उंब-याचा साज बनूनी ये !!

Miss U...!!!

आकाशाशी बोलताना
सागराकडे बघत.....
वा-याच्या कानात
सांगतेस तू..........
सावळ्याशी बोलताना
सावलीकडे बघत
सानिकेच्या सुरात
सांगतेस तू........
....... माझ्या मनाच पाखरु
....... भाबडं वासरु...miss U !!

आसवांशी खेळाताना
आठवांना हसवत....
पापणीच्या पदरात
सजतेस तू...........
खळ्यांमधे लाजताना
कळी बनून सजताना
हुंदक्याच्या धुक्यात
बोलतेस तू.........
........... माझ्या मनाचं पाखरु
.......... भाबडं वासरु..miss U !!

प्रश्न !!

या इथे मी सोडतो माझ्या खुणा
शोधशील तू नव्याने, राधिके, मला पुन्हा !

आज ही ती गात आहे, गोकुळात सानिका
सावळ्याची सावली की, शांत क्लांत मृत्तिका
भोवरा पायास माझ्या ग जुना........ १

पापणी बंद जराशी, आसवे गाली नको
जाणत्या वाटा तरीही, शापही भाळी नको
जाणता अजाणता हा का गुन्हा...... २

हीच वेळ...

हीच वेळ
आसवांना नाव देउ
हीच वेळ
भावनांना गाव देउ
हीच वेळ
आसवांना गाव का रे ?
हीच वेळ
भावनांना नाव का रे ?
हीच वेळ
मैतरांना छत देउ
हीच वेळ
वेदनांना रीत देउ
हीच वेळ
मैतरांना रीत का रे ?
हीच वेळ
वेदनांना छत का रे ?

निराश झालो नाही..

जरी अडकलो, पुन्हा नव्याने,
काही सांगणे नाही
जरी घसरलो, आज पुन्हा,
वळून पाहणे नाही !

तुटले, सुटले, किती सवंगडी,
केली ना गणती
डोळ्यांमधे ध्यास ठेवला,
मनासही कळले नाही !

गझलेसाठी आज बैसलो
गझल नाही जमली
गीतामधे अडकुन गेलो
निराश झालो नाही !

इतकच !

इतकच !

मित्र आहेत काहीच
कुणी सरळ सांगते
कुणी सांगत नाहीत
इतकच !

कुणी उगाच नाचतात
कुणी गालात असतात
मोठ्यांनं बोलत नाहीत
इतकच !

सीमारेषा आपण आखतो
स्वातंत्र्य आपण चाखतो
इतरांची आठवण येत नाही
इतकच !

मित्रा, मी तुझा आहे,
नक्की
तू पण माझा आहेस,
नक्की
अल्याडचा मी पल्याड येत नाही
इतकच !

साधासा अनुभव..

साधासा अनुभव... पण उदास करणारा..

काल एक झाड पडले
वठले होते
कुजले होते
पानांशिवाय
सजले होते......
कोसळून पडले
उसळून पडले...
पालिकेची माणसे आली
आपले काम करुन गेली
मी ओला कच्च
आठवाचे पिशाच्च..
लहानपणी खेळलो होतो
झाडापाशी रडलो होतो
झाड माझा भोज्जा होता
लपण्याचा सज्जा होता
झाड माझे स्ट्ंप्स होते
फ़ांदी... मंकी जंप्स होते
झाडापाशी भेटु बरका
झाडामागे थांबु बरका
झाडाविना वठलेल्याही
आज झालो आहे पोरका......
कोसळून पडलं कोणं..
झाड का मी ?
उन्मळून तुटलं कोणं
झाड का मी ?


त्याच्या तुटलेल्या खोडातुन डोकावणारी
माझी जुनीच खोड....
खडुने त्याच्यावर लिहीण्याची....
आणि वाळलेल्या पारंब्यात
माझ्या भुतकाळाची....
गंजलेली दोरी..
सारं सारं..
तुटलेलं
उन्मळून पडलेलं.......!!

ते पडलं
त्याच्या सकटं
काही घरटी पडली....
काही उडून गेली......
मनात फ़क्त
चिवचिवाट
किलबिलाट
...................गोंगाट !
दोन सुरांमधल्या सुराचा
एक अस्पष्ट कलकलाट !!!

ऐकतेस ना ?

जगत असताना अनेकवेळा काही नाजुक नाती मिळून जातात. एकदम पारदर्शक असतात. मात्र दवबिंदुसारखी क्षणभंगुर नाही.. तर मनावर कोरली गेलेली असतात. या नात्यांना देवाचा आशीर्वाद असतो आणि आभाळाची सावली असते !!


ऐकतेस ना ?

नाती बनत असतात ग
वाती जळत हसतात ग
श्वासालाही भार असतो,
आरसे खोटे बोलतात ग !!

हातामधे हात कशाला
थरथर उगा नाचती ग
डोळ्यांमधे अधे मधे
ओले मोती साचती ग !!

नात्याला या नाही नाव
अनिकेत फ़िरते ग
श्वासामधे, भासामधे
ठेक्यामधे उरते ग !!!!

तुझी सय, ऐक सई
मना मधे येते ग....
गिरकी घेते, निळी सावळी
होत पाखरु.. गाते ग !!


नाही मोजमाप लावलं
तुझ्यामाझ्या नात्याला....
कशाला उगाच
शापायचय ग......
या.. देवाघरच्या मातीला ?
आंदण मिळाल्यावर गप राहवं....
उगाच प्रश्न कशाला....
उभे आडवे
वाकडे तिकडे
सवाल जबाब कशाला ?

बदल..

त्रेतायुगातही पाउस पडताना
टप टपच आवाज येयचा.....
पावसात फ़रक इतकाच
......................................की आज आपण भिजतो
......................................पूर्वी पुरूषोत्तम भिजायचा !!

जुन्या कवितांना कुरवाळताना
कवितेलाच मी कळायचो,
कविता वाचत असताना
डोळ्या मधुन गळायचो !
आज मलाच कविता कळते
अलगद पणे हातात येते,
इतकी बाजारू झाली आहे
ज्याचा त्याचा रंग घेते....!!
बदल कशात आहे..
तिच्यामधे का माझ्यामधे
पूर्ण होतच नाही ती
संपून जाते........ अधे मधे...!!

शमीचं झाड....

शमीचं झाड....

प्रत्येकावर ही वेळ येतेच
हारता हारता जिंकण्याची
किंवा नकळत हारण्याची
नामुष्की ही येतेच...!!!!!

शस्त्र नकोत, अस्त्र नकोत
ब्रह्मविद्या नकोच नको,
शिष्टाई करणारा तो
देवकीनंदन नकोच नको..!!

थोडं थांब, सबूर सबूर
एक शांत गाव हवं,
प्रत्येकाच्या आयुष्यात
एक शमीचं झाड हवं....

सावळ्याचे मरण...!!

आपल्या मनात असणा-या भावनांचा मान ठेवतच कधी कधी पुराणाकडे इतिहास म्हणून बघताना काही वेगवेगळ्या गोष्टी दिसू शकतात. यामधे भावना दुखाविण्याचा हेतू नसतोच.... असते ती कवि कल्पना... ईश्वराला साक्षी ठेवत त्याच्या अवतारातील काही मानवी पदर उलगडाण्याची.......

सावळ्याचे मरण...!!
एक प्रश्नचिन्ह..!!

फ़ाळभर घुसलेल्या भाल्यासारखे
रूतुन बसले आहे
आपल्या सर्वांच्याच हॄदयात..!!
कर्मण्येवाधिकारस्ते....
पाठ करताना नाही कळलं...
पण अर्थ कळाला आणि मस्तक भणभणलं....
सुभद्राहरण, जरासंधाचा वध
पादाक्रांत केलेला मगध...!!
एकमेवाद्वितीय कुरू घराण्यावर घातलेली मोहिनी.....
आणि यशस्वी केलेले सारथ्य...
भारतातल्या महाभारताचे.....!!!
कर्मण्येवाधिकारस्ते..???
नसता मेला जयद्रथ...
नसता आला शिख्ंडी तर
देवव्रतासमोर नागडे झाले असते
सावळ्याचे पांडव..!!
राधेय तुडवला गेला आणि द्रौपदी बटीक होयची वाचली..
सारं माफ़ असतचं तिथे... मान्य..
पण झेंडा कशाला मग.. कर्मण्येवाधिकारस्तेचा..?
फ़ेडायला लागलं त्याला..
कोणा भिल्लाच्या बाणाच्या टोकावर बसुन यम आला
क्षिरसागरातले सुदर्शन परत नेण्यासाठी...
ठिपकत ठिपकत मेला माझा सावळा....
यशोदेची मायेची फ़सवणुक
राधेची समाजातली मानहानी...
हजारो श्वासांच्या कुरूक्षेत्रामधल्या आहुती ...
सारं सारं भोवलं त्याला..
समोर बुडाले यादव...
गंजुन गेलं सुदर्शन...
सडुन गेली बासरी...
परक्या हाती मरणं..
आणि बेवारस प्रेतासारखी विल्हेवाट..!!!!!!
असा शेवट महाभारताच्या विश्वकर्म्याला..?
पटत नाही ना..
सत्य आहे......
आपण षंढ.... डोळे झाकुन बसलेलो सारे....
स्विकारायला हवं हेही रूप माझ्या
लाड्क्या सावळ्याचं....!!

साधीभोळी कविता

साधीभोळी कविता :

माझी कविता घाबरणारी
समाजाला
बिचकणारी....
कोणी डोळे मोठे केले
तर कोप-यात जाउन
हिरमुसणारी...!!
तिला शाप खरेपणाचा
कणा कणानं वाढत जाउन
ब्रह्मांडाला वेडावण्याचा....
कणा कणाने वाढते..म्हणुन,
तिचा कणाच मैच्युअर् होतो...
कवितेचा श्वास,
भासात सिक्युअर होउन जातो...!!
आहे तशी आहे
माझी कविता......
आहे तशीच राहणार
माझी कविता......
तिला पश्चिमेचे माप नाही
बदलण्याचा ताप नाही.....
ब्रह्मदेवाच्या कमंडलूतले तीर्थ आहे ती....
तिला आकाराचा शाप नाही..!!
पण म्हणुनच पापभीरू.......
ब्रह्माचं नात असल्याने....
सोडता येत नाही
वेशाला.......
तोडता येत नाही भाषेला.....
............हा मात्र शाप माझ्या कवितेला...!!
मवाळ राहुन मवाळ जगण्याचा !!
शब्दात राहुन शब्दात तगण्याचा !!